गडचिरोली : छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलिसांच्या पथकाने जिवाची बाजी लावून जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आहे. कोणाला मारून संपविण्यात आम्हाला कोणताही आनंद नाही; पण कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचविण्याचे काम कोणी करत असेल तर त्यांना धडा शिकविणे आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही निभावणार, असा निर्धार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सोमवारी येथे पोलीस जवानांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.
पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात शनिवारची नक्षलविरोधी मोहीम यशस्वी करणाऱ्या पोलीस अधिकारी व जवानांचा ना. वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस महानिरीक्षक (नक्षल अभियान) छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी समीर शेख (प्रशासन), एएसपी सोमय मुंडे (अभियान), एएसपी अनुज तारे (अहेरी उपमुख्यालय) आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शनिवारच्या नक्षल मोहिमेत सहभागी झालेल्या पोलीस जवानांच्या १६ तुकड्यांचे अधिकारी आणि कमांडर यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीआयजी संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालक जनसंपर्क अधिकारी पीएसआय अशोक माने यांनी केले. आभारप्रदर्शन एसपी अंकित गोयल यांनी केले.
कमांडो भत्ता वाढविण्याचा प्रस्ताव
नक्षलविरोधी अभियानातील पोलीस कमांडोंचा भत्ता वाढविण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. तो मंजूर होताच त्याचा लाभ मिळू शकेल, अशी माहिती यावेळी गृहमंत्र्यांनी दिली. तुम्ही खडतर परिस्थितीत काम करता प्राणाची बाजी लावून लढता, आपल्या परिसराच्या संरक्षणासाठी पुढेही लढत राहाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चॉईस पोस्टिंगच्या नियमाची अंमलबजावणी करणार
गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना ऐच्छिक ठिकाणी बदली देण्याबाबतच्या अध्यादेशाची अनेक वेळा अंमलबजावणी होत नसल्याकडे लक्ष वेधले असता, आता तसे होणार नाही. त्यासाठी घालून दिलेल्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली.