आष्टीतील घटना : शौचालयाच्या टाक्यात होते पडूनलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी येथील बाजार वॉर्ड क्रमांक १ मध्ये जनाळा चाऊस यांच्या मालकीचे घर बांधकाम सुरू असून शौचालय बांधकामासाठी खोदलेल्या १० फूट खोल खड्ड्यात दोन सख्खे भाऊ खेळताना पडले. दरम्यान प्रसंगावधान राखत गणपूर जि.प. शाळेचे मुख्याध्यापक यादव कोरवते यांनी त्यांना वाचविले. सदर घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.साहिल कुरेशी (६) व सोहेल कुरेशी (३) अशी बचावलेल्या दोन भावंडाची नावे आहेत. साहिल व सोहेल हे दोघे भाऊ खेळत असताना शौचालयासाठी खोदण्यात आलेल्या १० फूट खोल खड्ड्यात पडले. दरम्यान या ठिकाणाहून जाणारे गणपूर जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यादव कोरवते यांना टाक्यात पडल्याचे ते दिसले. कोरवते यांनी क्षणाचाही विलंब न करता टाक्यात उडी मारली व दोन्ही भावंडांना सुखरूप बाहेर काढले. शौचालयाच्या खड्ड्यात पडल्यानंतर साहिल व सोहेल हे दोघेही पाण्यात डुबक्या खात होते. मुख्याध्यापक कोरवते यांनी लगेच उडी मारून दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान कोरवते यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी गडचिरोलीला नेण्यात आले आहे. पावसामुळे शौचालयाचा १० फूट खोल खड्डा पाण्याने भरला होता.
मुख्याध्यापकाने वाचविले दोन भावांचे प्राण
By admin | Published: July 17, 2017 12:59 AM