देसाईगंज : जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी व एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना शहरी भाग देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
आराेग्य विभागाचे कर्मचारी व अंगणवाडी सेविका तसेच मदतनीसच्या माध्यमातून कन्नमवार वाॅर्ड, जवाहर वॉर्ड, जुनी वडसा वॉर्ड, किदवाई वॉर्डात फेरी काढण्यात आली. आरोग्यविषयक विविध घाेषणा देऊन जनजागृती करण्यात आली. देसाईगंज शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत गरोदर महिला नोंदणीचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविणे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविणे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, कुष्ठरोग व क्षयरोग रुग्णांचे प्रमाण कमी असणे, कुटुंब शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी असणे आदीबाबत फेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सुरुवातीला जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन मिसार, प्रधानमंत्री मातृवंदना याेजनेच्या जिल्हा सल्लागार अश्विनी मेंढे यांच्या हस्ते करण्यात आला. जनजागृती करुन वाॅर्ड फेरीचा समारोप तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला. यावेळी सावंगीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे, तारकेश्वर अंबादे, नारायण वालदे, उमाकांत दरडमारे, चंद्रकांत चहारे, दिनकर संदोकर, धम्मदीप मेश्राम, सांख्यिकी सहाय्यक प्रियंका पुराम, आर. के. एस. के. समुपदेशक वनिता अढाऊ, क्षयरोग पर्यवेक्षक संदीप हुमणे उपस्थित हाेते. यशस्वीतेसाठी राहुल मेश्राम, नारायण किरमे, भाऊराव वागधरे, श्याम हजारे, तेजस करापे, नामदेव बिडकर, चंद्रकांत मेश्राम यांनी सहकार्य केले.