लाेकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे दीड वर्षापासून दुरुस्तीचे काम झाले. दवाखान्याच्या छताची दुरुस्ती, रंगरंगोटी झाली पण निकामी झालेली विद्युत फिटिंग तशीच खोलून ठेवली आहे. दवाखान्यातील इलेक्ट्रिक फिटिंगचे वायर अस्ताव्यस्त, लोंबकळत असून विद्युत सेवा पूर्ववत न केल्याने मागील दीड वर्षापासून दवाखान्याचा कारभार बाजूला असलेल्या माता बाल संगोपन केंद्रात चालू आहे. इमारत दुरुस्तीच्या कामावर १५ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विद्युत दुरुस्ती झाली नाही. परिणामी रुग्ण व नातेवाईक सुविधांपासून वंचित आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने निविदा काढून १५ लाख रुपयातून वैरागड प्राथमिक आराेग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती केली. मात्र आराेग्य केंद्रात अत्यावश्यक असलेल्या विद्युत सेवेबाबत काेणतेही काम झाले नाही. परिणामी बाह्यरुग्ण तपासणी, गंभीर आजारी असणारे रुग्ण, गर्भवती व प्रसूत मातांना बाजूला असलेल्या माता व बाल संगोपन केंद्रात भरती ठेवावे लागत आहे. त्यामुळे रुग्णांना, वैद्यकीय अधिकारी, दवाखान्याचे कर्मचारी यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळ्यात जास्त गावांचा समावेश असून मागील दीड वर्षापासून दवाखान्याचा कारभार चार खाटांच्या माता बाल संगोपन केंद्र सुरू असल्याने रुग्णांची गैरसोय टाळावी अशी नागरिकांची मागणी आहे.
कोट...
सन २०१९-२० या वर्षात जिल्हा परिषद गडचिरोली सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून जिल्ह्यातील ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरूस्ती झाली आणि रंगरंगोटी झाली त्या ठिकाणच्या दवाखान्यातील विद्युत दुरुस्तीचे काम अपूर्ण आहे. जिल्हा परिषदेच्या पुढच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेऊ.
- संपत आडे, जि.प.सदस्य, वैरागड