इतर विषाणूंच्या तुलनेत काेराेनाच्या विषाणूमध्ये संसर्ग घडवून आणण्याची क्षमता सर्वाधिक आहे. संसर्गाची ही साखळी ताेडण्यासाठी काेराेना पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध आराेग्य विभागामार्फत घेतला जातो. त्यासाठी संबंधित रुग्ण व त्याचे कुटुंबीय कोणाकोणाच्या संपर्कात आले, कुठे गेले होते आदी माहिती विचारली जाते. मात्र, संबंधितांकडून माहिती लपविली जाते. परिणामी, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींपर्यंत पाेहाेचणे आराेग्य विभागालाही कठीण झाले आहे. अनेकदा संसर्ग झाल्यानंतरही ती व्यक्ती खुलेआम बाहेर फिरत असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आशावर्कर, एएनएम, एनपीडब्ल्यू यांचे गावस्तरावर पथक तयार करण्यात आले आहे. मागील काही दिवसांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या घटली हाेती. त्यामुळे पथकांचे काम थंडावले हाेते. आता मात्र रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही पथके पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येते. माहिती दिली जात नसल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेणे कठीण हाेत आहे. नागरिकांनी खरी माहिती दिल्यास संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेळीच विलगीकरणात ठेवणे शक्य आहे.
बाॅक्स .....
दाेन रुग्णांना पुन्हा काेराेनाची लागण
एकदा काेराेनातून बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा काेराेनाची लागण हाेत नाही, असा गैरसमज नागरिकांमध्ये आहे. काेराेनातून बरे झालेले रुग्णसुद्धा आपल्याला काेराेना हाेत नाही, असा गैरसमज बाळगून काेणतीही खबरदारी घेत नव्हते. मात्र, जिल्ह्यातील दाेन व्यक्तींना दाेनदा काेराेनाची लागण झाली असल्याची माहिती आराेग्य विभागाकडे आहे. त्यामुळे आता काेराेना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
बाॅक्स .......
आठ नवीन बाधित तर चार काेराेनामुक्त
गुरुवारी जिल्ह्यात आठ नवीन काेराेनाबाधित आढळून आले, तर चार जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या नऊ हजार ४९० झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ३११ जणांनी काेराेनावर मात केली आहे. ७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. १०५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.११ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ०.७८ टक्के, तर मृत्युदर १.११ टक्के झाला आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिराेली शहरातील गांधी वाॅर्ड १, कन्नमवारनगर १, आयटीआय चाैक १, काेटगल १, चामाेर्शी तालुक्यातील नवाेदय विद्यालय घाेट येथील १ व स्थानिक एका जणाचा समावेश आहे. तसेच मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील १ रुग्ण व दुसऱ्या एका रुग्णाचा समावेश आहे.