गडचिरोली : येथील गोकुलनगरात नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी नियमितपणे कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे वाॅर्डामध्ये बहुतांश ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. या ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
बायोगॅस अनुदान मिळते ताेकडे
गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास, या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात गोधन आहे.
पुलाची उंची वाढवा
धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा हा मार्ग बंद होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी हाेत आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवासी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करताना, त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.
शिवमंदिराकडे दुर्लक्ष
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती आहे. अमिर्झापासून ४ किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हे मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.
लाइनमनची पदे भरा
एटापल्ली : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहाय्यकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. दुर्गम भागातील वीजपुरवठा लवकर सुरळीत हाेत नाही.