लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुका मुख्यालयापासून अंदाजे १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपखारी गावाजवळ भरधाव कार आणि ट्रॅक्टरमध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. ही धडक एवढी जबर होती की, कारच्या समोरील भाग चिपकून गेला तर ट्रॅक्टर तीन भागात विभागला गेला. हा अपघात शुक्रवारच्या रात्री घडला. या अपघातात बेतकाठी येथील ट्रॅक्टर चालक राकेश नैताम आणि चिचगड (जि.गोंदिया) येथील कार चालक रमेश येडे हे दोघे जखमी झाले. हा ट्रॅक्टर आलेवाडा येथील चैनसिंग कोराम यांच्या मालकीचा होता. बेतकाठी येथील शेतकरी मुरारी कुंजाम हे सदर ट्रॅक्टरने (एमएच ३५, एजी ९४६३) आलेवाडा येथून धान घेऊन बेतकाठीकडे निघाले होते. त्याचवेळी चिचगडकडून कोरचीकडे येणाऱ्या कारची त्या ट्रॅक्टरसोबत समोरासमोर धडक झाली. महामार्गावरील पिपरखारी गावाजवळ या दोन्ही भरधाव वाहनांची टक्कर झाल्याने कार व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु जीवितहानी झाली नाही.
दोन चिमुकली मुले बचावली- अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये पाच सदस्य होते. त्यात दोन चिमुकली बालकेसुद्धा होती. पण त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही हे विशेष. - मात्र दोन्ही वाहनांच्या चालकांना चिचगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्ह्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली. - कोरची पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून वाहनचालकांवर गुन्हा दाखल केल्याचे समजते.