अनेक मार्ग बंद : शहरातील सखल भाग जलमय; कुरखेडा, भामरागड, आरमोरी, कोरचीत अतिवृष्टी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मंगळवारी रात्री व दिवसा जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर येऊन मार्ग बंद पडले. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभरात सरासरी ५३.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक पाऊस कोरची, आरमोरी, कुरखेडा, भामरागड या तालुक्यात झाला. मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. पहाटे व सकाळी मूसळधार पाऊस झाला. त्यानंतर दुपारच्या सुमारास थोडीफार उसंत दिली. त्यानंतर आणखी ४ वाजतानंतर मूसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. या पावसामुळे दुर्गम भागातील नाले व नद्यांवरील ठेंगण्या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक मार्ग बंद पडले. गडचिरोली - तालुक्यातही दमदार पाऊस झाला. शहरातील कन्नमवार वार्ड, विवेकानंद नगरात पाणी साचले. नगर परिषदेच्या प्रांगणातही पाणी साचल्याने नगर परिषदेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. धानोरा - तालुक्यातील धानोरा-येरकड-मालेवाडा मार्गावरील इरूपधोडरी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग पहाटे ५ वाजतापासून बंद झाला. उपदली ते खामतळा मार्ग रात्रीपासूनच बंद आहे. इरूपढोडरी मार्गावरील मुस्काजवळील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी धानोराचे तहसीलदार महेंद्र गणवीर पोहोचले. जयसिंगटोला येथील मडावी यांच्या घराजवळ पुराचे पाणी जमा होण्यास सुरूवात झाल्याने त्याला घर सोडण्याचे आदेश तलाठ्यांनी दिले. धानोरा तालुक्यातील सुरसुंडी मार्गही बंद पडला. भामरागड - तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बोडी, तलाव पूर्णपणे भरले असून मंगळवारी झालेल्या पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नद्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्य:स्थितीत पर्लकोटा तुडूंब भरून वाहत आहे. इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास भामरागड शहरातील विश्वेश्वरराव चौकातील घरांना धोका निर्माण झाला आहे. एटापल्ली - तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे तालुक्यात धान रोवणीच्या कामांना वेग आला. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठेंगणे पूल बुडून मार्ग बंद होण्याचा धोका निर्माण झाला. आष्टी - परिसरातही मुसळधार पाऊस झाला. मात्र परिसरातील सर्वच मार्ग सुरू होते. वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. आष्टी-गोंडपिपरी मार्गावर वैनगंगा नदीवर ठेंगणे पूल आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर या पुलावरून पाणी वाहते. मात्र मंगळवारच्या पावसाने पुलावरून पाणी चढण्याची शक्यता कमी आहे. जिमलगट्टा - अहेरी तालुक्यातही दमदार पाऊस झाला. जिमलगट्टा परिसरातील देचलीपेठा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरातील १५ गावांचा संपर्क तुटला आहे. आरमोरी - तालुक्यात सुमारे ९९.८ मिमी पाऊस पडला. सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. अनेकांच्या घरात पाणी सुध्दा शिरले. त्यामुळे घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. वैरागड - मंगळवारी पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने वैरागड परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला. वैरागड-मानापूर मार्ग बंद पडला. पाठणवाडा नाल्याला पाणी असल्याने वैरागड-कढोली मार्ग बंद पडला. वैरागड-रांगी नाल्यावर कुकडीजवळ नवीन पुलाचे काम झाले. परंतु सदर काम अपूर्ण आहे. पुलाच्या बाजुची माती घसरत असल्याने वैरागड-कुकडी मार्ग अडचणीचा ठरला आहे. देसाईगंज - तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रोवणीच्या कामांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाभरात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:31 AM