गडचिरोली : जिल्ह्यात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. संपूर्ण जिल्हा जलमय झाला. धानोरा तालुक्यात वीज पडून एकाचा बळी गेला तर भामरागड व धानोरा तालुक्यात प्रत्येकी एक जण पुरात वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडला. एटापल्ली तालुक्यात जीप नाल्यात वाहून गेली. सुदैवाने त्यातील तिघे सुखरूप बाहेर आले.
आलापल्ली-भामरागड महामार्ग क्र. १३० डी वर भामरागड येथे पर्लकोटा नदी तुडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे भामरागडचा संपर्क तुटला. जिल्ह्यात २० रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावे संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात रेडअलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी नदीकाठी तसेच धोक्याच्या ठिकाणी पुलांवरून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. सर्व परिस्थिती नियंत्रणात असून आपत्ती व्यवस्थापन विभाग दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
२१ रस्ते पाण्याखाली
गडचिरोली चामोर्शी, चातगाव-कारवाफा पोटेगाव- पावीमुरांडा घोट रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी, पोटेगाव जवळ लोकल नाला, देवापूर जवळील नाला), कुनघाडा- गिलगाव पोटेगाव रस्ता (पोटेगावजवळ), तळोधी- आमगाव-एटापल्ली-परसलगोंदी गट्टा रस्ता राज्यमार्ग (पोहार नदी), तळोधी -आमगाव -एटापल्ली- परसलगोंदी गट्टा रस्ता (बांडीया नदी), अहेरी - आलापल्ली -मुलचेरा रस्ता (गोमणी नाला), अहेरी आलापल्ली- मुलचेरा- घोट रस्ता (कोपरअली जवळील नाला), अहेरी- मोयाबीनपेठा वटरा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला), आलापल्ली- ताडगाव -भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्लकोटा नदी), आलापल्ली - ताडगाव भामरागड - लाहेरी राष्ट्रीय महामार्ग (गुंडेनुर नाला) व (बिनागुंडा नाला), कसनसूर -एटापल्ली -आलापल्ली रस्ता राज्यमार्ग [करमपल्ली जवळील नाला, एलचिल जवळील नाला), कसनसूर -एटापल्ली- आलापल्ली रस्ता (एटापल्ली जवळील नाला) आष्टी- गोंडपिंप्री- चंद्रपूर, कढोली- सावलखेडा असे एकूण २१ रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
कन्नमवार धरण ओव्हरफ्लो
चामोर्शी तालुक्यात रोहणी, मृग नक्षत्रे कोरडे गेले. धानाचे पन्हे करपून जाण्याची शक्यता असतानाच आर्द्रा नक्षत्रातील रिमझिम पावसाने काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान, १७ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रेगडी येथील कन्नमवार धरण ओव्हरफ्लो झाले.
कन्नमवार धरणात ४३ ठक्के जलसाठा होता. पावसाने रात्रीतून धरण १०० टक्के भरले. पावसाने जोरदार हजेरी लावली. १८ रोजी सकाळी ६:०० वाजता जलाशय १०० टक्के भरल्याची माहिती दिना पाटबंधारे विभागाचे अभियंता विकास दुधबावरे यांनी दिली.
कन्नमवार धरण भरल्याने आता पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी स्वाती परदेशी यांनी दिली.
एसडीआरएफ, नागपूर येथील तुकडी पाचारण. एक पथक पाटेगाव, राजोली (ता. गडचिरोली) येथे तैनात केले असून उर्वरित पथक मुख्यालयी ठेवले आहे.
राजोली येथील आठ, हालेवारा (ता. एटापल्ली) येथील दोन व एटापल्ली येथील आठ जण पुरात अडकले होते. त्या सर्वांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षितस्थळी हलविले आहे.
जीप वाहून गेली
सुरजागड पहाडीजवळील हेडरी-बांडे रस्त्यावरील नाल्यातील पाण्यात मंगळवारी दुपारी लॉयड मेटल्स कंपनीची जीप वाहून गेली. त्यातील तिघे सुखरूप बाहेर आले. जीप तिथेच अडकून पडली.
व्यापारी अडकले वाटेत, एटापल्लीचा बाजार भरलाच नाही
एटापल्ली : तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. नदी, नाले तुडुंब भरून वाहिल्याने आलापल्ली, कसनसूर, गट्टा हे प्रमुख मार्ग बंद झाले. आलापल्लीवरून एटापल्लीला येथील बाजारकरिता व्यापारी येतात, परंतु डुम्मे नाल्याला पूर आल्याने व्यापारी वाटेतच अडकले. अनेक मार्ग बंद असल्याने व शेतीची कामे सुरू असल्याने अनेक जण आलेच नाहीत, त्यामुळे मंगळवारचा येथील आठवडी बाजार भरलाच नाही.