गडचिरोली-चंद्रपुरात पावसाचा हाहा:कार; वडेट्टीवारांनी सरकारकडे केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 01:24 PM2024-07-21T13:24:24+5:302024-07-21T13:29:57+5:30
पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विनाविलंब करण्यात यावे, असंही वडेट्टीवार म्हणाले.
Gadchiroli Flood ( Marathi News ) : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत असून विदर्भातील अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, "गडचिरोलीतील पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले पाहिजे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे," अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधे आणि निवारा पुरवण्याची जबाबदारी सरकारने तातडीने हाती घ्यावी. तसेच, पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न विनाविलंब करण्यात यावे, असंही ते म्हणाले.
गडचिरोलीतील पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले पाहिजे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 21, 2024
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे.
पूरग्रस्तांना अन्न, पाणी, औषधे आणि निवारा…
चंद्रपुरात कशी आहे स्थिती?
सुमारे तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या कधी संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वैनगंगा, वर्धा, अंधारी, उमा व पिंपळनेरी या नद्यांना पूर आला. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथील मामा तलावाची पाळ फुटल्याने सुमारे ३०० घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्य सुरू झाले आहे.
चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील एक नवीन डांबरी रस्ता वाहून गेला. मूल तालुक्यातील अंधारी नदीला पूर आल्याने चंद्रपूर-मूल, जानाळा-सुशी, मूल-करवन, मूल सावली, राजोली - पेटगाव मार्ग बंद झाले आहे. मूलमधील रामपूर वॉर्डात पुराचे पाणी शिरल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मूल-चंद्रपूर मार्गावरील आगडी येथील तलावाचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील दूधवाही रेल्वेच्या अंडरपास पुलामध्ये पाणी, नागरिकांना ये - जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. चंद्रपूर तालुक्यात वर्धा नदीवरील धानोरा नजीकच्या पुलावर पाणी, चंद्रपूर - भोयेगाव ते गडचांदूर तसेच कोरपना मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील उमा नदीला पूर, मूल- ब्रह्मपुरी मार्गही बंद झाला आहे. रात्रभर संततधार पाऊस झाल्याने वर्धा नदीला पूर. वरोरा - वडकी मार्ग बंद झाला आहे. मूल तालुक्यातील अंधारी नदीच्या पुराचे पाणी पोंभुर्णा तालुक्यातील शेतात. पोंभुर्णा-वेळवा व थेरगाव मार्ग बंद. सिंदेवाही तालुक्यात जामसळा नदीला पूर आल्याने जुना जामसळा गावात पाणी शिरले. सिंदेवाही तालुक्यातील पांढरवाणी येथील तलावाची पाळ फुटली असून तलावातील पाणी वाहून गेले.