देसाईगंज : येथील रेल्वे फाटक सातत्याने बंद असते. त्यामुळे रेल्वे विभागाने पर्यायी तोडगा म्हणून भूमिगत पुलाची निर्मिती करुन वाहतूक सुलभ करुन दिली. परंतु या मार्गावरुन जास्त उंचीची अवजड वाहने अनेकवेळा बोगद्यात अडकून वाहतुकीचा खोळंबा हाेते. त्यामुळे बाेगद्यामधून अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी हाेत आहे.
देसाईगंज शहर हे दोन भागात विभागले गेले आहे. पूर्वी वडसा शहराच्या पूर्व भागातून पश्चिमेकडे ये जा करण्यासाठी रेल्वेफाटकाशिवाय पर्याय नव्हता. त्यातच रेल्वेची वाहतूक वाढल्याने दिवसातून अनेकवेळा फाटक बंदचा फटका आवागमन करणाऱ्या वाहतूक वाहनांना व पादचारी लोकांना बसत होता. देसाईगंज रेल्वे समिती व नगरपरिषद यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर भुयारी पुलाची निर्मिती केली. भुयारी पुलाच्या दोन्ही बाजुला विशिष्ट उंचीचे ओव्हरहेड लोखंडी रोधक लावलेले आहेत. त्यावर ३.५५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे अशा वाहनांसाठी बायपास रोडचा पर्याय दिला आहे. तरीही टिप्पर, रोड रोलर, डांबर प्लांटचे गरम डांबर भरलेले ट्रक, विटा, मुरुम, गिट्टी भरलेले ट्रॅक्टर हे याच मार्गाने जातात. ही वाहने भुयारी पुलाच्या दोन्ही बाजुला पादचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या मार्गावरच चढून तर कधी विटाने भरलेले अवजड ट्रॅक्टर रिव्हर्स येऊन पलटी मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परवा भुयारी पुलाच्या अगदी तोंडावर रोडरोलर डिझेल संपल्याने मध्येच उभा राहिला. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती. त्यामुळे ३.५० मीटरपेक्षा कमी उंचीचे पण अवजड वाहनात मोडतात अशा वाहनांना या भुयारी पुलातून जाण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी पादचारी व वाहनधारकांनी केली आहे.