अनेक गावांत संकट : बैलबंडीने ड्रमातून आणावे लागते पाणी लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : गाढवी नदीमुळे देसाईगंज तालुक्याची दोन भागात विभागणी झाली आहे. गाढवी नदीच्या अलिकडील भागात इटियाडोह धरणाच्या पाण्याने उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा होत असल्याने या परिसरात पाणीटंचाई भेडसावत नाही. मात्र गाढवी नदीपलिकडील भागात नदीला पाणी असूनही पाणीस्त्रोतात वाढ होत नसल्याने पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील कुरूड येथे नळ पाणीपुरवठा योजना असूनही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना बैलबंडीने ड्रमातून पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी पाणी आणावे लागत आहे. देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागाची मदार ही हातपंपावर आहे. सद्य:स्थितीत किती हातपंपामधून नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे हा चिंतनाचा विषय असून तेच पाणी पिऊन नागरिक आपली तहान भागवित आहेत. मे महिना अर्धा संपला असून ग्रामीण भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. हातपंपाच्याही पाण्याची पातळी खालावली आहे. हातपंपाचे अति खोलीतील पाणी हे क्लोराईडयुक्त येत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देसाईगंज तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहेत. तालुक्यातील कुरूड येथे वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. दीड कोटी रूपये खर्च करून येथे फिल्टर व पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र नियोजनाअभावी कुरूडवासीयांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. शुद्ध पाणी मिळत नसल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजना संलग्नीत वाढीव पाणीपुरवठा व फिल्टरची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे. अडपल्लीच्या अर्ध्या भागात पाणी समस्या तीव्र गडचिरोली तालुक्यातील गोगाव नजीकच्या अडपल्ली येथे ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून अडपल्ली येथील नवीन वस्तीत व देऊळ मोहल्ल्यात नळाला पाणी येत नाही. या दोन्ही वस्तीत ५० वर घरे आहेत. तसेच अडपल्लीच्या चढ भागात नळाला पाणी येत नाही. नागरिक त्रस्त आहेत.
कुरूड येथे भीषण पाणीटंचाई
By admin | Published: May 21, 2017 1:28 AM