गडचिरोली : शहरातील मार्केट लाइनमधील चेंबरची उंची जास्त झाली असून, रस्त्यापेक्षा दोन फूट उंच असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खासदार नेते यांनी सदर चेंबरची उंची १ फुटाने कमी करून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दोन्ही कंत्राटदारांना दिल्या.
गडचिरोली शहरातील मार्केट लाइनमधील अंडर ग्राउंड गटर लाइनची उंची अधिक वाढल्याने रस्ता उंच होणार असून, दुकान लाईनच्या गाळ्यामध्ये व घरामध्ये पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच गटार लाइन व ठरावीक अंतरावरील चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार मार्केट लाइनमधील व्यापाऱ्यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली. त्यानंतर ६ मार्च २०२१ रोजी खासदार अशोक नेते यांनी स्वतः शहरातील मार्केट लाइनमध्ये जाऊन गटार लाइन व चेंबर बांधकामाची पाहणी केली असता काबरा किराणा दुकानापासून त्रिमूर्ती चौक, साई मंदिर, तळघर ते हनुमान मंदिरापर्यंत बनविण्यात आलेल्या चेंबरची उंची जास्त झाली असून, रस्त्यापेक्षा दोन फूट उंच असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खासदार नेते यांनी सदर चेंबरची उंची एक फुटाने कमी करून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याच्या सूचना दोन्ही कंत्राटदारांना दिल्या. रात्रीच्या वेळी काम पूर्ण करून व्यावसायिक व ग्राहकांना दिलासा देण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
यावेळी खासदार नेते यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेड, कंत्राटदार तसेच मार्केट लाइनमधील व्यापारी व व्यावसायिक यांना सोबत घेऊन गटार लाइन व चेंबरची पाहणी केली.