लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माझी मनमिळावू स्वभावाची मुलगी तिच्या दारूड्या पतीकडून होणारा मार सहन करत राहिली. पोलिसात तक्रार केली तर आणखी त्रास देईल म्हणून आम्हीही चूप होतो. पण आता त्याने चक्क गळा आवळून तिचा जीव घेतला. या गुन्ह्याची सजा त्याला देऊन तिच्या आत्म्याला मरणानंतर तरी न्याय द्या, अशी आर्त मागणी मृत विवाहितेचे वडील गौतम साखरे (रा.बारव्हा, ता.लाखांदूर) यांनी गुरूवारी गडचिरोलीत पत्रपरिषदेत केली.वडसा तालुक्यातील उसेगाव येथील रहिवासी हेलन सुनील कºहाडे या विवाहितेचा दि.२१ रोजी संशयास्पद मृत्यू झाला. अचानक प्रकृती बिघडून तिचा मृत्यू होण्यामागे तिचा पती सुनील हाच असून त्यानेच गळा दाबून तिला मारले असा आरोप साखरे यांनी केला. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, हेलन आणि सुनीलचा विवाह ७ वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. पण लग्नाच्या दोन वर्षानंतर तो दारूच्या आहारी जाऊन हेलनला नेहमी मारहाण करीत होता. दरम्यान दि.२१ रोजी हेलनची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला वडसा येथील बन्सोड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र हेलनच्या गळ्यावर सूजन, जीभ बाहेर आलेली असल्याने डॉक्टरांना संशय आला. त्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस तिथे आलेही, पण हेलन काही बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे ते परत गेले. दरम्यान डॉ.बन्सोड यांनी तिला घेऊन ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण तिथे उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मुलीला पतीनेच गळा आवळून मारले अशी तक्रार घेऊन हेलनचे वडील देसाईगंज पोलीस स्टेशनला गेले, पण तिथे त्यांची तक्रार न घेता शवपरिक्षण अहवाल आल्यानंतर तक्रार करा असा सल्ला देण्यात आला. हेलनला पतीनेच मारले हे गावकरी सांगतात. पण मुलीच्या सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून पोलीस यंत्रणा कारवाई करीत नाही असा आरोप त्यांनी केला.
हेलनला पतीनेच मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:30 AM
माझी मनमिळावू स्वभावाची मुलगी तिच्या दारूड्या पतीकडून होणारा मार सहन करत राहिली. पोलिसात तक्रार केली तर आणखी त्रास देईल म्हणून आम्हीही चूप होतो.
ठळक मुद्देवडिलांचा आरोप : देसाईगंज पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ