आलापल्ली (गडचिरोली) : अहेरी तालुक्यातील आलापल्लीत लोहखनीज वाहतूक करणाऱ्या वाहनाने एका शिक्षकाचा बळी घेतल्यानंतर कुटुंबास मदतीचा हात न देता व अपघात रोखण्यासाठी ठोस उपाय न आखता मोठा गाजावाजा करत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम लॉयड मेटल्स कंपनीने घेतला, पण या कंपनीने वाटप केलेले हेल्मेट हे टिकाऊ नव्हे तर दिखाऊ असल्याचे १ जूनला रात्री स्पष्ट झाले. दुचाकीस्वाराचा अपघात झाला, यात हेल्मेट तुटले अन् डोकेही फुटले, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
लायड मेटल कंपनीतर्फे येथील वीर बाबूराव चौकात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप कार्यक्रम घेतला. यावेळी क्रिकेटपटू व अभिनेत्रीलाही पाचारण केले होते. दरम्यान, कंपनीने दिलेले हेल्मेट घालून रामकुमार चंद्र शेंडे (३५,रा.तानबोळी) हे दुचाकीवरुन १ रोजी रात्री साडेआठ वाजता गावी जात होते. रस्त्यावरील खड्डे चुकविताना एक ट्रक अचानक समोर आला, त्यानंतर दुचाकी घसरून त्यांचा नागेपल्ली येथे अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला तसेच पायाला दुखापत झाली.
विशेष म्हणजे हेल्मेट तुटून त्यांच्या डोक्याला जखम झाली. यावरुन हेल्मेटचा दर्जा लक्षात येतो. जखमी रुग्णावर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता भ्रमणध्वनी घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.