आमदारांची मंत्र्यांकडे मागणी : वर्ष उलटूनही मदत मिळाली नाहीदेसाईगंज : २७ एप्रिल २०१६ रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्रात अवकाळी पाऊस व चक्रीवादळ, गारपीट झाली. यामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेला एक वर्षांचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत मदत देण्यात आली नसल्याची बाब आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, चोप, सावंगी, आमगाव, कोकडी, कोंढाळा, शिवराजपूर, कुरूड, विसोरा, किन्हाळा, विहिरगाव, पिंपळगाव, चिखलीरिठ, पोटगाव, अरततोंडी या गावांमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ व गारपीठ झाली. यामध्ये उन्हाळी धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला. याबाबत आमदार क्रिष्णा गजबे यांनी २५ मे २०१६ रोजी कृषी मंत्र्यांना निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केली होती. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत देण्यात आली नाही. कुरखेडा तालुक्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ही बाब आमदारांनी लक्षात आणून दिली. पाटील यांनी तत्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत द्या
By admin | Published: March 26, 2017 12:43 AM