आष्टी : मागील वर्षीपासून हृदय व पाेटातील विकारामुळे चंदनखेडी (वन) येथील वेद संजय कुडमेथे (४) याला उपचाराची गरज आहे. परंतु त्याच्या उपचारासाठी लाखाे रुपयांचा खर्च येणार आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने नागरिकांनी सामाजिक भावनेतून वेदला आर्थिक मदत करावी, असे आवाहन चंद्रपूर येथील ओम विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ. भारत पांडे यांनी केले.
वेदला उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने मनस्वी पांडे (८) हिच्या हस्ते त्याला मदतीचा धनादेश देण्यात आला. कोविड व सामाजिक संशोधनाकरिता महात्मा फुले काॅलेजमधील प्रा. डॉ. भारत पांडे व मुधाेली तुकूम जि.प. शाळेचे मुख्याध्यापक संतोष नागरगोजे हे चंदनखेडी (वन) येथे गेले असता वेद कुडमेथे याची विदारक स्थिती पुढे आली. वेदविषयी चर्चा करीत असताना मनस्वी हिने वाढदिवस व पाहुण्यांकडून मिळालेले ७ हजार रुपये वेदला उपचारासाठी मदत दिली. त्याच्यावर छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यासाठी संतोष नागरगोजे हे स्वतः सुटी काढून गेले. वेदला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून मदत करावी, असे आवाहन प्रा. डॉ. भारत पांडे यांनी केले आहे.