लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या तीन आठवड्यांपासून पालकत्वापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला अखेर राज्याचे अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पालकत्व लाभले आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या विकासाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. रखडलेली कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिक ठेवून आहेत.गेल्या साडेचार वर्षांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अम्ब्रिशराव आत्राम यांचे मंत्रिपद गेल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्याला पालकमंत्री नव्हते. यादरम्यान गडचिरोलीशी भावनिक संबंध असणाऱ्या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही केली होती. त्यानुसार सरकारने शुक्रवारी जारी केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत गडचिरोलीसाठी मुनगंटीवार यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.राज्य सरकारचा कार्यकाळ संपत आल्यामुळे पालकमंत्र्यांना या जिल्ह्यासाठी आपले योगदान देण्यास जेमतेम दोन महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. मात्र तरीही मुनगंटीवार या जिल्ह्यात कामांचा धडाका लावतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.दोन ‘वारां’मुळे वाढले जिल्ह्याचे महत्त्वराज्याच्या राजकारणात उशिरा का होईना, गडचिरोली जिल्ह्याला चांगले दिवस येत आहेत. नुकतेच विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद मिळालेले विजय वडेट्टीवार हे गडचिरोलीचे रहिवासी आहेत. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात अनेक आंदोलने गाजविली आहेत. आता सरकारमध्ये महत्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळणारे ना.मुनगंटीवार हे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याचे राजकीय महत्त्व आणखी वाढले आहे. दोन ‘वारां’च्या या जुगलबंदीत जिल्ह्याचे भले होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
मुनगंटीवारांच्या पालकत्वाने जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:23 AM