अहेरी : मागील काही दिवसांपासून अहेरी शहरात १४ ते १७ वयोगटातील एक वेडसर मुलगी फिरत असल्याची माहिती अहेरी पोलिसांना मिळाली. सदर मुलीसोबत काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सदर मुलीचा शोध लावून तिला पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी तिच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर चौकशीअंती सदर वेडसर मुलीला तिच्या गावी व्यंकटरावपेठा येथे नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले. या मुलीचे नाव रोजा सिडाम रा. व्यंकटपेठा असे आहे. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक छाया तांबुस्कर यांनी रोजा सिडाम हिच्या नातेवाईकांचा शोध लावला. बुधवारी अहेरी पोलिसांनी सुखरूपरित्या रोजा सिडाम हिला तिच्या नातेवाईकांकडे व्यंकटराव पेठा येथे पोहोचविण्यात आले. रोजाला वडील नसून तिची आई दुसऱ्या गावी राहते. त्यामुळे रोजा सिडाम ही आपल्या मामा व आत्याकडे वास्तव्यास राहत होती. मागील काही दिवसांपासून ती घरून निघून गेल्याने तिचे नातेवाईक तिचा शोध घेत होते. मात्र अहेरी पोलिसांच्या सहकार्याने रोजा आपल्या घरी सुखरूप पोहोचली. यावेळी अहेरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पी. आर. मडावी, व्ही. एस. येनगंटीवार, महिला पोलीस कर्मचारी एस. एम. मडावी, जे. एल. हेडो, तसेच रोजाचे नातेवाईक उपस्थित होते. रोजा सिडाम ही सुरक्षितरित्या घरी पोहोचल्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी अहेरी पोलिसांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या मदतीने रोजा घरी सुखरूप पोहोचली
By admin | Published: November 03, 2016 2:32 AM