६० टक्क्यांवर गुण आवश्यक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना देसाईगंज : शैक्षणिक २०१६-१७ पासून राज्य शासनाने शासकीय वसतिगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांकरिता भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच पदवी व पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यापेक्षा जास्त गुण असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत इयत्ता अकरावी ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या ठिकाणी राहून शिक्षण घेण्यासाठी भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार, निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ६० हजार रूपयांच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. क वर्ग महानगर पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भोजनभत्ता २८ हजार, निवास भत्ता १५ हजार व निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ५१ हजार रूपये, तसेच उर्वरित ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण ४३ हजार रूपयांचे अनुदान विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी प्रती वर्ष पाच हजार रूपये व अन्य शाखेतील २० हजार रूपये मिळणार आहे. (तालुका प्रतिनिधी) दिव्यांगासाठी सवलत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये या योजनेत सवलत देण्यात आली आहे. ५० टक्के गुण असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ मार्च २०१७ ही लाभ घेण्याची अंतिम तारीख आहे.
गुणवंतांना शिक्षणासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2017 2:07 AM