लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सततच्या पूरपरिस्थितीने बेजार झालेल्या भामरागड तालुक्यातील मरकणार या अतिदुर्गम गावात जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत: जाऊन मदतीचे वाटप केले.
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भामरागड पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी निधी गोळा केला. त्या निधीतून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून भामरागडच्या कोटी ग्रामपंचायत अंतर्गत मरकणार या गावी स्वत: जाण्याचे ठरवले. या दुर्गम गावाची लोकसंख्या जेमतेम 245 असून 55 कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावाला चारही बाजूने नदी असल्याने त्या गावापर्यंत मदत पोहचू शकली नव्हती. मंगळवार 24 सप्टेंबरला त्या गावी मदत पोहचवण्यासाठी नदीतून लाकडी डोंग्यावरुन जाऊन सर्व साहित्य पलीकडील गावात पोहचविण्यात आले. गावात जाण्यासाठी धड रस्ताही नसल्याने चिखलातून वाट काढत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बुरले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चौहान, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्रीशांत कोडप, अभियंता अमित तुरकर, शाखा अभियंता खोकले, भामरागडचे गटविकास अधिकारी महेश ढोके, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम, विस्तार अधिकारी देवारे यांच्यासह काही ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मदत पोहचवण्यासाठी सहकार्य केले.मदत साहित्यात तांदूळ, चना डाळ, तेल, मीठ, बिस्कीट, टोस्ट ब्लँकेट, ताडपत्री आदी साहित्य होते. मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले की, या ठिकाणी पुढच्या चार महिन्यात बेली ब्रिज तयार होईल व तुमचे पावसातील येणे जाणे सुलभ होईल. यानंतरही कुठली मदत हवी असेल तर सांगावे आम्ही मदत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. अतिदुर्गम भागातील लोक कोणत्या परिस्थितीत जगतात हे पहिल्यांदाच या भेटीनिमित्ताने जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहता आले.