लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. धान आणि कापसाच्या नुकसानीसाठी दिल्या जाणाऱ्या एकूण ३४ कोटी ५३ लाख रुपयांच्या मदतीपैकी तूर्त ९ कोटी २० लाख रुपयेच उपलब्ध झाले आहेत. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार आहे. त्यामुळे ही मदत प्रथम कोणत्या गावाला वाटायची आणि नंतरच्या टप्प्यात कोणाला घ्यायचे हे ठरविण्याचा करण्याचा यक्षप्रश्न प्रशासकीय यंत्रणेपुढे उभा ठाकला आहे.शेतकºयांना आता नवीन खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. गेल्या हंगामात खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात धानाच्या पिकावर मावा-तुडतुडा तर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. सर्व्हेक्षणानंतर शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनात मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलेच शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी मदतीची रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरले असून त्यांना ३४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पण सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना काही महिने ताटकळत राहावे लागणार आहे.तीन टप्प्यात वाटप केल्या जाणाऱ्या रकमेपैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिला टप्प्यात ११ कोटींची रक्कम मंजूर झाली. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख एवढीच रक्कम प्राप्त झाली. ही रक्कम आता कोणत्या गावांना वाटायची हे ठरविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.पूर्ण मदत मिळण्यास लागणार विलंबपहिल्या टप्प्याची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व तहसीलदारांच्या खात्यात स्थानांतरित केली जाईल. तहसीलदारामार्फत ती रक्कम प्रथम टप्प्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नंतर त्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर शासनाकडून दुसऱ्या टप्प्याची मदत दिली जाईल. ती वाटप झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याची मदत मिळेल. अशा प्रकारे संपूर्ण मदत मिळण्यासाठी अर्धाअधिक पावसाळा निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.केंद्राच्या मदतीअभावी उशीरराज्यात रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्यामुळे राज्य शासनाला एकरकमी मदत देणे जड जात आहे. केंद्र सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत दिल्यास सर्व शेतकऱ्यांना एकाचवेळी मदतीचे वाटप होऊन खरीप हंगामासाठी त्या रकमेचा हातभार लागू शकतो.
तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:57 AM
यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.
ठळक मुद्देपहिला हप्ता ९.२० कोटींचा : कोणत्या गावाला आधी मदत द्यायची? प्रशासनापुढे यक्षप्रश्न