रमेश मारगोनवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जेमतेम तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे लग्न झाले. काही वर्षातच तिचा संसार चांगला बहरला आणि ती दोन मुले आणि एका मुलीची आई झाली. थोड्याशा मिळकतीतही तिचा संसार समाधानाने सुरू होता. पण मंगळवारची पहाट तिला दु:खाच्या महासागरात लोटणारी ठरली. नक्षलवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्येने तिच्या जीवनाचा आधारच तिच्यापासून कायमचा दूर झाला होता. आपल्या संसारवेलीवर फुललेल्या चिमुकल्यांना घेऊन आता जगायचे कसे, आणि कोणाच्या आधाराने? असा यक्षप्रश्न उभा ठाकलेल्या त्या अभागी मातेच्या डोळ्यातले अश्रूही आटल्याचे हृदयद्रावक चित्र मंगळवारी पहायला मिळाले.कसनासूर या जेमतेम १५० लोकवस्तीच्या गावातील तीन जणांची नक्षलवाद्यांनी हत्या करून त्यांचे मृतदेह गावाजवळ आणून टाकले. त्या तीनही कुटुंबप्रमुखांचे संसार आज उघड्यावर आले. तिघांच्या पत्नी आणि मुलांच्या आयुष्यासमोर आज काळोख दाटला आहे. भेदरलेल्या नजरेने भविष्याचे चित्र पाहताना शून्यात गेलेली त्यांची नजर त्यांच्या अपार दु:खाची कल्पना देत होती. नक्षलींच्या दहशतीने संपूर्ण गाव ताडगाव पोलीस मदत केंद्रात आश्रयाला आले.त्यात तीनही मृतांच्या पत्नी आपल्या मुलांना घेऊन आल्या होत्या. त्यातील कन्ना रैतू मडावी (३०) या मृत युवकाची मुले सर्वात लहान आहेत. पोलिसांनी दिलेल्या जेवणातून कन्नाची पत्नी मन्नी तीनही निरागस मुलांच्या पोटात दोन घास भरवत होती. पण तिच्या घशाखाली एकही घास उतरत नव्हता. हीच अवस्था इतरही दोन मृतांच्या पत्नींची होती.
मदतीसाठी कोण धावणार?गेल्या आठवड्यात एटापल्लीजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी पुढाकार घेतला. पण नक्षल दहशतीने जगणे असह्यझालेल्या कसनासूरमधील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आणि तीनही मृतांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी कोणीही नेतेमंडळी आली नाही. त्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.