अहेरी : शहरातील मुख्य चाैकातील हायमास्ट गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. परिणामी राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बंद असलेल्या हायमास्टची दुरुस्ती करून चाैकात उजेडाची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर मगड्डीवार यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सहा वर्षांपूर्वी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतून चाैकात हायमास्टची उभारणी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग अहेरीमार्फत हे काम झाले असून, त्यावेळी हायमास्टचा उजेड हाेता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हायमास्टमध्ये बिघाड झाला असून तांत्रिक अडचणीमुळे ते बंद पडले आहे. परिणामी मुख्य चाैकात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य राहत आहे.
याविषयी नागरिकांनी नगरपंचायतीला माहिती दिली. परंतु त्या हायमास्टचे हस्तांतरण नगरपंचायतला झाले नसल्याने आम्ही कार्यवाही करण्यास असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले. मात्र, काही सुजाण नागरिकांनी बांधकाम कार्यालयात भेट देऊन होणाऱ्या समस्येविषयी सांगितले. मात्र त्या कार्यालयामार्फत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिक संभ्रमात आहेत. सहा महिन्यांच्या अवधीनंतर तरी मुख्य चौकातील उजेड पूर्ववत व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अमोल गुड्डेल्लीवार, प्रशांत गोडशेलवार व दिघु खतवार आदी उपस्थित होते. संबंधित बांधकाम विभागाला पत्र पाठवून लवकरच योग्य ताे ताेडगा काढू, असे मुख्याधिकारी साळवे यांनी सांगितले.