गडचिरोली : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार हिरामण वरखडे यांना गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने दिला जाणारा ‘गडचिरोली गौरव’ पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करुन बुधवारी सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे, साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे, सत्कारमूर्ती हिरामण वरखडे, मीना वरखडे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी प्रेसक्लबचे अध्यक्ष विलास दशमुखे होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे म्हणाले, पत्रकारिता ही शक्ती असून, ती वापरायची कशी, हे पत्रकारांनी ठरविले पाहिजे. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे हा पत्रकारितेचा स्थायीभाव आहे. दुर्दैवाने आज संपादक, मालक आणि राज्यकर्ताही तोच असतो. अशावेळी पत्रकारांकडून कुणाला तरी न्याय मिळण्याची आशा धूसर होते, असे ते म्हणाले. डॉ. अभय बंग म्हणाले, अलिकडे राजकारणातील कर्तृत्व नसणाऱ्या माणसांचा गवगवा केला जातो, त्यांची मोठमोठी पोस्टर्स लागतात. ते बघून कार्लाइनच्या वक्तव्याची आठवण होते, शिवाय आजचे ‘हिरोज’ कुठे आहेत, असा प्रश्न पडतो. अशावेळी हिरामण वरखडे यांची गडचिरोली गौरव पुरस्कारासाठी निवड होणे म्हणजे खऱ्या हिरोचा सन्मान होय. हिरामण वरखडे यांनी ३० वर्षे अविरत सेवा केली आहे. प्रा. ठाकुरदास बंग यांच्यासोबत ते जिल्हाभर फिरले आणि स्वत:ला सेवेत वाहून घेतले. हिरामणजींनी सतत कार्यरत राहून वैचारिक निष्ठा अभंग ठेवली, असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना हिरामण वरखडे म्हणाले की, आपण ग्रामस्वराज्य, ग्रामसभांना अधिकार, वनाधिकार, पाणलोट क्षेत्र विकास यासाठी काम केले. उपरोक्त प्रत्येक बाबीतून राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक लोकशाही निर्माण होण्यास मदत होईल. आम्हाला युद्ध नको, तर बुद्धाची क्रांती हवी आहे. युद्धच होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावयाची आहे. संचालन जयंत निमगडे, प्रास्ताविक अरविंद खोब्रागडे, आभार अनिल धामोडे यांनी केले.(स्थानिक प्रतिनिधी)
हिरामण वरखडे ‘गडचिरोली गौरव’ने सन्मानित
By admin | Published: January 07, 2016 2:01 AM