गडचिराेली : पाेषण ट्रकर ॲप मराठीतून करावा, निकृष्ट दर्जाचे जुने माेबाइल परत घेऊन नवीन माेबाइल देण्यात यावे आदी मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने १२ ऑगस्ट राेजी जिल्हा परिषदेसमाेर आंदाेलन करण्यात आले.
पाेषण ट्रॅकर ॲपसाठी शासनाने माेबाइल दिले आहेत. मात्र हे माेबाइल जुने झाले आहेत. तसेच गरम हाेऊन हॅंग हाेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. ॲप डाऊनलाेड करण्यासाठी जागा मेमरीसुद्धा शिल्लक नाही. त्यामुळे हा माेबाइल परत घेऊन दुसरा माेबाइल द्यावा. पाेषण ट्रॅकर ॲप सदाेष असून ताे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात आहे. माेबाइलवर काम करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ५०० व २५० रुपये प्राेत्साहन भत्ता दिला जाते. मात्र त्यात अनियमितता आहे आदी मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमाेर आंदाेलन करण्यात आले.
आंदाेलनाचे नेतृत्व आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, डाॅ.महेश काेपुलवार, आयटकचे सचिव ॲड.जगदीश मेश्राम, राधा ठाकरे, जहारा शेख, अनिता अधिकारी, ज्याेती काेमलवार, मिरा कुरूजकर, रूपा पेंदाम, ज्याेती काेल्हापुरे, कुंदा बंडावार, आशा चन्ने, दुर्गा कुर्वे, मीनाक्षी झाेडे, रेखा जांभुळे, शिवलता बावनथडे, अल्का कुनघाडकर, अल्का लाऊटकर, माधुरी रामटेके, मीरा उईके, प्रेमिला मने, विमल गेडाम, कविता शेंडे, जलील खाॅ पठाण, संजय वाकडे, प्रशांत खाेब्रागडे यांनी केले.