लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच ठिय्या आंदोलनही करण्यात आले.समितीचे दक्षिण गडचिरोलीचे युवा अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयासमोर भर पावसात अवाजवी वीज बिलाची होळी करण्यात आली. अभियंत्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात वीज बिल युनिटचे बिल कमी करावे, अनावश्यक स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, वीज विक्री कर, सुरक्षा ठेव, कृषिपंपाचे वीज बिल व ग्रामीण भागातील लोडशेडींग पूर्णत: रद्द करावी, अवाजवी वीज बिल निम्मे करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम, उपाध्यक्ष रमेश गम्पावार, सभापती रमेश टिकले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार, विलास चिटमलवार, सचिन मोतकुरवार, प्रमोद देवतळे, निजाम शेख, शरिफ शेख आदीसह शेकडो विदर्भवादी व अन्यायग्रस्त वीज ग्राहक उपस्थित होते. आंदोलन कर्त्यांना सुरेश बारसागडे व विलास चिटमलवार यांनी मार्गदर्शन केले.विदर्भात वीज निर्मिती होत असूनही गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भारनियमन केले जाते. रात्रीबेरात्री वीज पुरवठा खंडित केला जातो. अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठविली जातात. बिघाड झालेले वीज मिटर लवकर दुरूस्त करून दिले जात नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. यशस्वीतेसाठी उमेश उसेंडी, शुभम वन्नमवार, झुरी, पुल्लुरवार, तेलकुंटलवार व इतर युवकांनी सहकार्य केले.यावेळी अभियंत्यांसोबत वीज समस्येबाबत चर्चा करण्यात आली. एटापल्ली तालुक्यातील वीज समस्या मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरण व प्रशासनाला देण्यात आला.
विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:18 AM
वीज युनिटचे दर कमी करावे, आदीसह विजेच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती एटापल्लीच्या वतीने १ आॅगस्ट रोजी गुरूवारी एटापल्लीच्या महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली.
ठळक मुद्देएटापल्लीत भर पावसात आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन; युवकही सहभागी