मुंबई - महाराष्ट्र (Maharashtra) दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना मोठं यश मिळालं. गडचिरोली येथे चकमकीत ३८ लाखांचे बक्षीस असलेले ३ नक्षलवादी (Naxali) ठार झाले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या C६० दलाने या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर, दुसऱ्याचदिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट छत्तीसगड महाराष्ट्राच्या बॉर्डवर पोहोचले. सैन्य दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईचं कौतुक करत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील मान्ने राजाराम परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही चकमक झाली होती. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, देवेंद्र फडणवीस यांनी अहेरी तालुक्यातील दामरंचा गावात जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. इतिहास घडला.. अतिसंवेदनशील भागात, अतिदूर्गम भागात नागरिकांमध्ये जाऊन संवाद साधला. त्यांच्या मनातले जाणून घ्यायचे प्रयत्न केले.. इथे सर्व बंधू भगिनींना, बालमित्रांना भेटून आनंद झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.
दरम्यान, गडचिरोली भेटीदरम्यान, फडणवीसांनी विविध कार्यक्रमांना उपस्थित लावली. यावेळी, पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉलचे उद्घाटनही देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.