गडचिराेली : दारिद्र्य रेषेत (बीपीएल) मध्ये माेडत असलेल्या अनेक नागरिकांकडे पक्के घर, टीव्ही, फ्रीज, दुचाकी वाहन आहे. मागील अनेक वर्षांपासून बीपीएल यादीचे पुनर्सर्वेक्षण झाले नसल्याने हे नागरिक बीपीएलमधील अनेक याेजनांचा लाभ घेत आहेत. गडचिराेली जिल्ह्यात एकूण ४० हजार १८९ नागरिक आहेत.
अतिशय गरीब असलेल्या कुटुंबाला सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी शासनामार्फत विविध याेजना राबविल्या जातात. अतिशय गरीब असलेल्या कुटुंबांचा समावेश बीपीएल यादीमध्ये करण्यात आला. २००२ ते २००७ या कालावधीत बीपीएलबाबत सर्वेक्षण करून २००७ मध्ये यादी अंतिम करण्यात आली. याला आता जवळपास २० वर्षांचा कालावधी उलटत चालला आहे. मात्र, अजूनपर्यंत पुनर्सर्वेक्षण झाले नाही. बीपीएल कुटुंबातील काही कुटुंबांची प्रगती झाली आहे. त्यांच्याकडे स्लॅबचे घर, दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. काही कुटुंबातील सदस्य नाेकरीलासुद्धा लागले आहेत. तरीही ते बीपीएलच्या याेजनांचा लाभ घेत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे.
बाॅक्स...
सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाची अंमलबजावणी नाही
२०१३ मध्ये केंद्र शासनाने सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले हाेते. या बाबीला आता आठ वर्षांचा कालावधी उलटला आहे. परंतु, अजूनपर्यंत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. तसेच त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स...
स्वत: नाव वगळणे आवश्यक
- ज्या व्यक्तीचे उत्पन्न वाढले आहे किंवा ज्या कुटुंबातील सदस्य शासकीय नाेकरीला लागला आहे, अशा सदस्याने आपले उत्पन्न वाढले असल्याने बीपीएल यादीतून नाव वगळावे, अशी विनंती ग्रामपंचायतीकडे करावी लागते. तेव्हाच नाव वगळता येते. मात्र, अशी विनंती कुणीच करीत नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत असतानाही ते कुटुंब बीपीएल यादीत असल्याचे दिसून येते.
- ग्रामपंचायतीमध्ये बीपीएल कुटुंबाची यादी आहे. या यादीनुसार बीपीएलचा दाखला द्यावाच लागते.
बाॅक्स...
पडके घर असणारा मात्र एपीएलमध्ये
काही कुटुंबांची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. पडके घर आहे. दाेनवेळच्या जेवणासाठीही संघर्ष सुरू आहे, अशा कुटुंबांचा मात्र एपीएलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या कुटुंबांना शासकीय याेजनांचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येते.
बाॅक्स...
चारचाकी असणाऱ्यालाही मिळते रेशन
स्वस्त रेशनचा लाभ मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीचे उत्पन्न ५० हजारांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांकडे चारचाकी वाहन असतानाही त्यांना रेशनचा लाभ दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स....
तालुकानिहाय बीपीएल कुटुंब
तालुका बीपीएल
गडचिराेली ४८७१
धानाेरा १४५७
चामाेर्शी ९२६३
मुलचेरा १३४६
देसाईगंज ३०७८
कुरखेडा २३४०
काेरची ९०३
आरमाेरी ६१७१
अहेरी ५१४७
एटापल्ली ७७८
सिराेंचा ३३३३
भामरागड १५०२
एकूण ४०,१८९