काेराेनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये म्हणून विद्यार्थ्यांच्या हातात स्मार्ट फाेन ऑनलाईन शिक्षणासाठी देण्यात आले. माेबाईलमुळे मुले बिघडतात, हा काेराेनापूर्वीचा समज आता कुठे गेला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शाळेत जाणारी मुले आता घरीच राहत असल्याने त्यांची शिक्षणाची असलेली गाेडी कमी झाली. घरबसल्या अभ्यास करतानाही विद्यार्थी कंटाळा करीत आहेत. प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्याने नर्सरीपासून तर आठवीपर्यंतचे विद्यार्थी बेशिस्त व आळशी बनले आहेत.
गडचिराेली जिल्ह्यात १२ ही तालुके मिळून जिल्हा परिषदेच्या एकूण दीड हजार शाळा आहेत. या शाळेतील शिक्षक स्मार्ट फाेनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गृहपाठ व इतर स्वाध्याय देत आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत शहरी भागात स्मार्ट फाेन व इंटरनेटची सुविधा आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थी यात सरस आहेत. मात्र इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात माघारले आहेत.
काेट...
काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाची प्रक्रिया राबविताना पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. स्वाध्याय व परीक्षासुद्धा ऑनलाईन स्वरूपात पार पडल्या. काेराेनामुळे अध्यापनाच्या नवीन पद्धती व तंत्र निर्माण झाले. संगणकाचा प्रभावी वापर अध्यापनात केला जात आहे. मात्र ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना साेयीसुविधांअभावी शिक्षणात अडचणी येत आहेत.
- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (प्राथ.)