जागतिक सिकलसेल दिन कार्यक्रम : विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच आरोग्यधाम कुष्ठरोग निर्मूलन संस्था कुरखेडाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सिकलसेल दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी रक्तदान करणारे रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजनकर्त्यांचा प्रशस्तीपत्र, मोमेंटो व रोपटे देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते होते. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष योगीता पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली देशमुख, जिल्हा प्रशिक्षण पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जि. प. सदस्य वर्षा कौशिक, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैदमवार, डॉ. अनुपम महेशगौरी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी सिकलसेल रुग्णांची नोंद करून सिकलसेल रुग्णांच्या विविध तपासणीकरिता रक्त नमूने घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अनिल रूडे म्हणाले, सिकलसेल आजार पुढील पिढीत टाळण्याकरिता सिकलसेल रुग्णांनी विवाहपूर्वी सिकलसेल तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य कुंडली तपासूनच सिकलसेलग्रस्तांनी लग्न करावे. जास्तीत जास्त व गरजेच्या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, जेणे करून सिकलसेल, थॅलेसिमिया आदी रुग्णांना रक्त पुरवठा करता येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रमोद पिपरे यांनीही मार्गदर्शन केले. गरोदर माता, पोलीस जवानांना नक्षली चकमकीच्या वेळी रक्ताची फार गरज असते. एक व्यक्ती वर्षातून तिनदा रक्तदान करू शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी यावेळी केले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
रक्तदाते व शिबिर आयोजनकर्त्यांचा सन्मान
By admin | Published: June 20, 2017 12:41 AM