गाेपाल लाजूरकर, गडचिरोली : सर्चचे संचालक पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांना आसामच्या काझिरंगा विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. काझिरंगा विद्यापीठ जोरहाट येथे ११ जुलै राेजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात डॉ. बंग यांना आसामचे मुख्यमंत्री डाॅ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते पदवीने सन्मानित करण्यात आले.
काझिरंगा विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा दीक्षांत समारंभ मंगळवारी थाटात पार पडला. पद्मश्री डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याची जगाने दखल घेतली आहे. न्युयॉर्कच्या टाईम नियतकालीकाने डॉ. बंग यांना ‘ग्लोबल हेल्थ हिरो’ चा सन्मान दिला आहे. तर सामाजिक क्षेत्रातला सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.
गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरते सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देश-परदेशात उपयुक्त ठरत आहे. डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांच्या कार्याची दखल घेऊन आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काझिरंगा विद्यापीठातर्फे आतापर्यंत इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. एस. किरण कुमार, प्रख्यात सरोद वादक पद्मविभूषण अमजद अली खान, भारतरत्न प्रा. सी. एन. आर. राव, पद्मभूषण मेरी कोम, प्रख्यात संशोधक पद्मश्री डॉ. उद्धव भराली, पद्मभूषण नेमबाज अभिनव बिंद्रा, भारताचे वनपुरुष पद्मश्री जादव पायेंग,यांच्यासह अन्य मान्यवरांना सन्मानित करण्यात आले आहे.