लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांनी बुधवारी (दि.१६) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे आरमोरीत अन्यायग्रस्त सफाई कामगारांनी रास्ता रोको करून आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे बुधवार आंदोलनवार ठरला.महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या वतीने आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जमा होऊन नारेबाजी केली. कोरोना काळातील सेवेसाठी प्रतिदिन ५०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आयटकचे राज्य सचिव विनोद झोडगे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, आयटकचे जिल्हा सचिव ॲड.जगदीश मेश्राम, आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव रजनी गेडाम यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. १५ जूनपासून कोरोना कामासहित सर्वच कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्यभरातील आशा व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई येथे आशा व गट प्रवर्तक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ११ जून रोजी आयोजित केली होती. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. आशा व गट प्रवर्तक यांच्याकडून मार्च २०२० पासून कोरोनाचे काम करून घेतले जात आहे. त्यामुळे इतर कामे करण्यात वेळ मिळत नाही. केंद्र सरकार आशांना फक्त दरमहा एक हजार रुपये देत आहे. इतर कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देत आहे. कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता म्हणून आशा व गट प्रवर्तक यांना प्रतिदिन ५०० रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी इतरही अनेक मागण्यांवर चर्चा झाली. पण प्रोत्साहन भत्त्याच्या मुद्यावर निर्णय झाला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले.