तीन लाखांचे नुकसान : जीवित हानी टळली, गुड्डीगुडम येथील घटनागुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे १८ मे रोजी गंगाराम लसमय्या गावतुरे यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांचे घर जळून पूर्णपणे खाक झाले. यामध्ये गावतुरे यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या घरामध्ये कुणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गावतुरे कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. घर जळाल्याने गावतुरे कुटुंबासमोर वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुड्डीगुडम परिसरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान गंगाराम गावतुरे यांच्या घरावर वीज कोसळल्याने आग लागली. घटनेची माहिती मिळताच सरपंच महेश मडावी, माजी पं. स. सदस्य गंगाराम आत्राम, हाशिक हुसैन शेख, प्रफुल नागुलवार, संतोष गणपुरवार, संतोष सिडाम, श्रीकांत पेंदाम, प्रभाकर सिडाम, अनिल पेंदाम व गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग पूर्णपणे आटोक्यात आणता येणे शक्य होत नव्हते.घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. महसूल विभागाचे कर्मचारी व तलाठी मेश्राम यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घरामध्ये असलेली ७० हजार रूपये रोख, १५ क्विंटल धान, टीव्ही, डीश, भांडे, दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू, दागदागिने असा एकूण तीन लाख रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. गावतुरे यांना तत्काळ मदत देण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
वीज कोसळल्याने घर जळून खाक
By admin | Published: May 21, 2016 1:19 AM