प्रशासनाचा दिरंगाईपणा : घरकूल लाभार्थ्याला धनादेशाची प्रतीक्षाप्रदीप बोडणे - वैरागडघरकुल मंजूर होताच ‘अच्छे दिन आ गये’ असे समजून वैरागड येथील मारोती नेवारे यांनी जुने घर पाडले. मात्र उन्हाळा संपला. पावसाळा जवळ येऊनही घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे घरकुलाचे काम ठप्प पडले असून पावसाळ्यात गुजरान कोठे करावी, असा प्रश्न मारोती नेवारे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. वैरागड येथील मारोती नेवारे यांना यावर्षी ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर केले. त्यासाठी ६७ हजार रूपये एवढे अनुदान मिळणार होते. मोडक्यातोडक्या घरात संपूर्ण आयुष्य काढणार्या मारोती नेवारे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी जुने घर पाडून त्याच जागेवर ग्रामविकास अधिकार्याकडून नवीन घर बांधण्याविषयी जागा आखून घेतली. राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी तात्पुरता संसार किरायाच्या खोलीमध्ये हलविला आहे. घर पाडल्याबरोबर दोन दिवसात तुम्हाला २५ हजार रूपयाचा धनादेश दिला जाईल. त्या धनादेशातून घराच्या पायव्याचे काम करण्याचे सांगण्यात आले. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही त्यांच्या खात्यात धनादेशाची रक्कम जमा झाली नाही. एक महिना त्यांनी वाट पाहिल्यानंतर तत्काळ ग्रामपंचायत गाठून झालेला प्रकार लक्षात आणून दिला. ग्रामविकास अधिकार्यांनी धनादेश २९ एप्रिललाच बँक खात्यात जमा केला असल्याचे सांगितले. मात्र रक्कम अजूनपर्यंत जमा झाली नसल्याने नेवारे यांची चिंता वाढायला लागली आहे. पैशाअभावी नवीन घराचे बांधकाम थांबले आहे. तर जुने घर पूर्णपणे पाडण्यात आले आहे. पावसाळ्यात घराचे बांधकाम करण्यासाठी मजूर मिळत नाही. त्याचबरोबर या दिवसात स्वत:ही शेती करणार की घर बांधणार असा प्रश्न मारोती नेवारे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे नेवारे यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ आणखी लांबणीवरच असण्याची शक्यता आहे.
घर पाडले; मात्र घरकुलाचा पत्ता नाही
By admin | Published: May 30, 2014 12:03 AM