शासनाच्या वतीने खुला प्रवर्ग वगळता इतर सर्वच गरीब कुटुंबांसाठी घरकूल योजना राबविली जाते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रमाई घरकूल योजना, आदिवासी समाजाच्या कुटुंबांसाठी शबरी आदिवासी घरकूल योजना तसेच इतर प्रवर्गातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते. या तीनही योजनांची अंमलबजावणी सिरोंचा तालुक्यात सुरू आहे. मात्र शासनाकडून लाभार्थ्यांच्या अनुदानाचा निधी प्राप्त न झाल्याने ३४२ लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
सिरोंचा तालुक्यात ३९ ग्रामपंचायती असून यातील बहुतांश ग्रा. पं. च्या गावांमध्ये रमाई योजनेतून घरकूल मंजूर करण्यात आले. लाभार्थ्यांची यादीही तयार झाली. या यादीनुसार आदीमुक्तापूर ग्रा. पं. मध्ये ९ घरकूल मंजूर आहेत. अंकिसा ग्रा. पं. अंतर्गत ४, आरडा ८, बेजूरपल्ली १, चिंतावेला ३२, गर्कापेठा २, गोलागुड्डम १, गुमलकोंडा ५८, जाफ्राबाद ३०, जानमपल्ली १, कोर्ला १, कोटापल्ली १, लक्ष्मीदेवीपेठा ६, मादाराम ४, मद्दीकुंटा २०, मेडाराम ४, मोयाबिनपेठा १७, नडीकुड्डा ५६, नगरम ८, नारायणपूर ४, परसेवाडा १९, पातागुडम १, पेंटिपाका २१, पोचमपल्ली ५, रंगयापल्ली ८, सिरकोंडा ८, टेकडामोटला ६, वडदम २, व्यंकटापूर ७ व झिंगानूर १ अशी एकूण ३४२ घरकुले मंजूर आहेत.
असरअल्ली, कोपेला, नरसिंहापल्ली, रामंजापूर, रमेशगुड्डम, सोमनपल्ली, सुंकरअल्ली, विठ्ठलरावपेठा (माल) अशा एकूण ९ ग्रामपंचायतींमध्ये रमाई घरकूल योजनेसाठी एकही लाभार्थी नसल्याची माहिती पं. स. प्रशासनाकडून मिळाली आहे. ज्याठिकाणी एससी प्रवर्गातील लाभार्थी आहेत. त्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम देण्याची मागणी आहे.