फाेटाे.... आरमाेरी येथील रानतलावात अशाप्रकारे अतिक्रमण करुन बांधकाम केले आहे.
आरमोरी : शहरानजीक असलेल्या रानतलावात काही लाेकांनी अतिक्रमण करुन घरांचे बांधकाम केले आहे. मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष हाेत आहे. अतिक्रमणामुळे तलावातील जल साठवणूक क्षमता कमी झाली आहे. भविष्यात तलावातील बहुतांश जागा गिळंकृत केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरमाेरी येथील रानतलावातील भुमापन क्र. १२७६ व १२८४ मध्ये ३.९६ हे.आर. व ०.७१ (हे.आर) क्षेत्र असून माजी मालगुजारी तलाव (रानतलाव) जि.प. अंतर्गत येताे. या तलावाच्या पोटात काही लोकांनी अतिक्रमण करून त्या जागेवर नगर परिषदेची परवानगी न घेता बांधकाम सुद्धा सुरू केले आहे. रान तलाव हे शहराच्या मध्यभागी असल्याने अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यात सौंदर्यीकरण व्हावे ही आरमोरीकरांची इच्छा आहे. दिवसेंदिवस या तलावाची व्याप्ती कमी कमी होत आहे. पावसाळ्यात पाण्याचा साठा वाढून तलावाची संरक्षक पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावातील पाण्याच्या प्रवाहाने खालील भागात असलेल्या घरामध्ये, गावात पाणी शिरुन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या तलावातील पाणी उन्हाळ्यात पाळीव जनावरांना पिण्यासाठी तसेच जनतेच्या इतर कामाकरिता उपयोगी येत होते. विशेष म्हणजे, या तलावात ढिवर-भोई समाज पारंपरिक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्यास या समाजावर बेराेजगारीचे संकट काेसळू शकते. त्यामुळे या तलावाचे अस्तित्व अबाधित राहावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
बाॅक्स
पालकमंत्र्यांकडे केली तक्रार
आरमाेरी येथील रानतलावात अतिक्रमण करुन घरांचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धाेक्यात येत आहे. मात्र प्रशासन यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याने अतिक्रमण फाेफावण्याचा धाेका आहे. ही गंभीर बाब ओळखून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य अमाेल मारकवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीद्वारे त्यांनी तलावातील अतिक्रमण हटविण्याची मागणीही केली आहे.