लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : छत्तीसगड राज्यातून धानाेरा तालुक्यातील मुरूमगाव परिसरात प्रवेश केलेल्या हत्तींनी मागील १५ दिवसांपासून याच ठिकाणी बस्तान मांडले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुरूमगाव परिसरातील भाेजगाटा गावातील तीन घरांचे नुकसान हत्तींनी केले आहे. एका-एकीच हत्तींचा कळप गावात प्रवेश करून घरे पाडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुरूमगाव परिसरातील हिरवेकंच जंगल, आंघाेळ करण्यासाठी तलाव, बाेड्या उपलब्ध असल्याने पंधरा दिवसांपूर्वी गडचिराेली जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश केलेल्या हत्तींनी याच ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. अधूनमधून हत्तींचा कळप गावामध्ये प्रवेश करून घरांचे नुकसान करीत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भाेजगाटा येथील मंगरू तुमरेटी, महेंद्र गावडे, दसाराम तुमरेटी या तीन ग्रामस्थांच्या घरांची पडझड केली. यात घराचे माेठे नुकसान झाले. हत्तींचा कळप रात्री कधीही गावात चालून येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाचे पथक तैनातहत्तींवर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाने पथक नेमले आहे. हे पथक अजूनही हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवून आहे. या परिसरात जागृती केली जात आहे. गावागावांत बॅनर लावण्यात आले आहेत.
पिकांचे नुकसानहत्तींचा कळप केरमन्यार, कावडीसा, इरूपधाेडरी या परिसरात फिरत आहे. या परिसरातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत आहे. मध्यम कालावधीचा धान कापून झाला आहे. धानाचे पुंजने हत्तींकडून नष्ट केले जात आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
नागरिकांची झाेप उडालीहत्तींचा कळप रात्रीच्या सुमारास गावावर चालून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गावांतील नागरिक आळीपाळीने पाळत ठेवत आहेत. मात्र ही पाळत किती दिवस ठेवायची, असा प्रश्न नागरिकांसमाेर निर्माण झाला आहे. दिवसभर शारीरिक काम केल्यानंतर रात्रभर जागणे कठीण हाेत आहे. वनविभागानेच या हत्तींचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.