गडचिराेली : पूर्व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांतील शाळा १५ जून मंगळवारपासून सुरू झाल्या. विदर्भातील शाळा २८ जूनपासून सुरू हाेणार आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण पद्धती व शाळा उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. शिक्षण संचालकांनी शिक्षकांसाठी ५० टक्के व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थिती असावी, असे म्हटले आहे. या संदर्भात जि. प. चे नियाेजन व तसे आदेश अजूनही निघाले नाहीत. त्यामुळे किती शिक्षकांनी शाळेत जायचे रे भाऊ? असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केला जात आहे.
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ८५८ शाळा आहेत. यामध्ये १ हजार ४६४ जिल्हा परिषद शाळा आहेत. २०४ अनुदानित, तर १८ शाळा विनाअनुदानित आहेत. इंग्रजी माध्यमांच्या काॅन्व्हेंटसह ९१ शाळा स्वंअर्थसाहाय्य तत्त्वावर चालविल्या जातात. गतवर्षीचे शैक्षणिक सत्र काेराेना संकटामुळे ऑनलाईन पद्धतीनेच पार पडले. त्यापूर्वीच्या मार्च व एप्रिल महिन्यातील परीक्षा काेराेनामुळे ऑनलाईनच झाल्या.
काेट .....
२८ जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू हाेत असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार शिक्षण विभागाच्या वतीने तसे नियाेजन करण्यात येणार आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन पद्धतीनेच सुरुवातीला शैक्षणिक सत्र चालणार आहे.
- हेमलता परसा, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली.
बाॅक्स ......
संचालकांच्या पत्रांचे काय?
- पहिली ते नववी आणि अकरावीच्या वर्गाच्या सर्व शाळांमध्ये ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहिली. दहावी व बारावीच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती १०० टक्के अनिवार्य राहील. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे, असे शिक्षण संचालकांनी १४ जूनला काढलेल्या पत्रात नमूद आहे.
बाॅक्स ...
जि. प.चे पत्र नाही
- जिल्ह्यातील शाळा सुरू हाेण्यास १० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शिक्षण संचालकांचे पत्र प्राप्त झाले असले तरी शिक्षक, कर्मचारी उपस्थितीबाबत जि. प. ने काेणतेही आदेश वा पत्र काढले नाही.
काेट ......
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालणार असल्याने सर्व शिक्षकांची शाळेत उपस्थिती फारशी गरजेची नाही. काेविडच्या दृष्टिकाेनातून खबरदारी घेऊन शाळा ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे.
- विलास मगरे, शिक्षक
काेट ......
अहेरी उपविभागातील दुर्गम भागात अनेक शाळा दाेन शिक्षकी आहेत. ५० टक्के उपस्थितीनुसार एका शिक्षकाला सर्व कामे सांभाळावी लागणार आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार काम करू.
- उत्तम मडावी, शिक्षक