आष्टी : गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेले आणि जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी हे जवळपास आठ हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. चामोर्शी या तालुका मुख्यालयापासून आष्टीचे अंतर बरेच असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण होते. त्यामुळे आष्टी हा स्वतंत्र तालुका घोषित करावा, अशी मागणी गेल्या २० वर्षांपासून केली जात आहे. मात्र, या मागणीच्या पूर्ततेसाठी अजूनही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतलेला नाही.
२६ ऑगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. आज जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे झाली, मात्र आष्टी परिसरातील नागरिकांची गैरसोय संपलेली नाही. कित्येकदा तालुक्याच्या निर्मितीबाबत मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सर्वपक्षीय आंदोलने करण्यात आली, मात्र आष्टीवासीयांची घोर निराशाच झाली. काही वर्षाआधी आष्टी हा तालुका होणार म्हणून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. सर्वकाही तयार असताना वेळेवर मुलचेरा तालुका घोषित झाला. त्यामुळे आष्टीवासीयांच्या पदरी पुन्हा निराशा आली. सर्व सोयींनी युक्त असलेल्या आष्टी गावाला तालुक्याचा दर्जा देऊन परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे.
(बॉक्स)
५२ गावांतील नागरिकांची गैरसोय
चामोर्शी तालुका विस्ताराने फार मोठा आहे. या तालुक्यात नऊ जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. आष्टी येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. तसेच ग्रामीण बॅंक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तीन वरिष्ठ महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, चार हायस्कूल, महसूल मंडळ, पोलीस स्टेशन, मोठी बाजारपेठ असून, आष्टीला लागून ५२ गावे आहेत. या गावांतील नागरिकांना चामोर्शी येथे तालुक्याच्या ठिकाणी ४० किमी अंतरावर प्रत्येक कामासाठी जावे लागत असल्याने अडचणीचे होते. गोरगरिबांना ते आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आष्टीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी होत आहे.