लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान मागील वर्षीच्या सत्रापासून सुरू करण्यात आले. मागील वर्षी या अभियानाला शाळांनी चांगला प्रतिसाद दर्शवल्यानंतर यावर्षीही सदर अभियान राबवले जात आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी शाळांनी त्यांच्या शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती भरायची आहे. मात्र अजूनही सुमारे २९९ शाळांनी रजिस्ट्रेशनही केलेले नाही. यावरून या शाळा सदर स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शाळेने या अभियानात सहभागी व्हावे, यासाठी शिक्षण विभागामार्फत नियमित पाठपुरावा करून शाळांची नोंदणी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
आकडे बोलतात.... तालुका नोंदणी न केलेल्या शाळाअहेरी ६६ आरमोरी २१ भामरागड १९चामोर्शी ५४ देसाईगंज २५ धानोरा ११एटापल्ली २३ गडचिरोली १३ कोरची ८ कुरखेडा ४ मुलचेरा २२ सिरोंचा ३७
तीन पातळीवर बक्षिसेतीन लाख : तालुक्यावर पहिले बक्षीस ३ लाख, दुसरे २ लाख, तिसरे १ लाख रूपये दिले जाणार आहे.जिल्हा स्तरावर ११ लाख : जिल्ह्यावर प्रथम आलेल्या शाळेला ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख रूपये दिले जाणार आहे.विभागस्तरावर २१ लाख : विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल
४ सप्टेंबरपर्यंत मुदत नोंदणीची सुरुवात ५ ऑगस्टपासून झाली आहे. शाळांना ४ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून केंद्रस्तरावर मूल्यांकनाला सुरुवात होईल.
१ हजार ७१७ शाळांनी केली नोंदणी जिल्ह्यात १ हजार ६०६ प्राथमिक व ४१० माध्यमिक शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ४२५ प्राथमिक व २९२ माध्यमिक शाळांनी नोंदणी केली आहे. १८१ प्राथमिक व ११८ माध्यमिक शाळांनी नोंदणी केली नाही. प्रत्येक शाळेने नोंदणी करणे आवश्यक आहे.
"सदर अभियानात सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, यासाठी दरदिवशी पाठपुरावा केला जात आहे. सर्वच शाळा यात सहभागी करून घेतल्या जातील. विभाग स्तरावरील बक्षीस जिंकण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न राहील." - बाबासाहेब पवार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)