लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज: येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम काढता न आल्याने मशीन व डिस्प्ले बोर्ड तोडफोड करून चाेरटे पळून गेले. त्यामुळे देसाईगंज शहरातील पोलिसांच्या रात्रपाळी गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी दिनांक १७ ला रात्री उशिरा दोन ते तीन वाजता दरम्यान एटीएम मशीनचे शटर तोडून दर्शनी भागाचे काच फोडले. आत प्रवेश केल्यावर मशीनचा डिस्प्ले बोर्ड वर उचलून मागे पुढे करून तोडले व मशीन तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम काढता न आल्याने बँकेच्या समोर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकून एटीएम मशीनची तोडफोड केली आहे. बँक ऑफ इंडिया शाखा देसाईगंज येथील शाखा व्यवस्थापक वैभव भोयर यांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र सुगावा लागला नाही. पोलीस निरीक्षक महेश मसराम तपास करीत आहेत.
शाखा परस्पर हलविलीबँक ऑफ इंडियाची शाखा आधी मुख्य बाजारपेठेत होती. ही शाखा शहरातील शाळा परिसरात हलविण्यात आली. ही शाखा सामसूम जागेवर हलविले कसे असा प्रश्न शहरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या शाखेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठांचे आता तरी डोळे उघडले जातील अशी अपेक्षा आहे.