आरमोरी : तालुक्यातील मानापुर-मांगदा रस्त्याचे डांबरीकरण मोठ्या प्रमाणात उखडले असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे सदर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती तुळशीदास काशीकर व विनोद बेहते यांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील मानापूर मांगदा रस्त्याचे डांबरीकरण उखडून या रस्त्याची अवस्था अतिशय बकाल झाली आहे. या डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि याच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचून राहते, त्यामुळे रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता बळावलेली आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग डोळेझाक करीत आहे. सदर रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी उपसभापती तुळशिदास काशीकर, विनोद बेहरे व गावकऱ्यांनी केलेली आहे.