गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ बुधवार ५ जुलैला सकाळी १०:३० वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडणार आहे. राष्ट्रपतींचा जिल्ह्यात अवघा दीड तासांचा दौरा असेल. राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
राज्यातील नव्या सत्तानाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या सोहळ्यासाठी बंदिस्त वातानुकुलीत शामियाना उभारण्यात आला आहे.
धर्मरावबाबांना आमदार असताना दिले होते निमंत्रण, येणार मंत्री म्हणून....
या समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, धर्मरावबाबांना आमदार म्हणून निमंत्रण दिले होते, पण आता ते मंत्री म्हणून उपस्थिती लावणार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच गडचिरोलीत येणार असून थेट राष्ट्रपतींच्या उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमात सहभागी होतील.
सहा गुणवंतांना गोल्डन संधी, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
सदर समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ सहा विद्यार्थ्यांचा गौरव होणार आहे. एकापेक्षा अधिक सुवर्ण पदक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना ही गोल्डन संधी असेल. या विद्यार्थ्यांना मंचावर कसे जायचे, सत्कार कसा स्वीकारायचा याबाबतची माहिती आधीच देऊन ठेवली आहे.
एकूण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी २७८, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ६२, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ३९ तर आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३७ आहे.
यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाषा ४५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८, मानव विज्ञान विद्याशाखा ५४, आंतरविज्ञान विद्याशाखा ३० इतक्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एक हजार जणांची व्यवस्था
कोनशिला समारंभ व दहाव्या दीक्षांत समारंभ सोहळ्यासाठी प्रशासनाच्या वतीने विद्यापीठ परिसरात शानदार शामियाना उभारणी केली जात आहे. सदर शामियान्यामध्ये एक हजार लोकांची आसन व्यवस्था राहणार आहे. यात व्हिआयपी, प्राचार्य, पत्रकार, प्राध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश राहणार आहे.
१७७ एकर जागेवर होणार कॅम्पस
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित नवीन परिसराचा कोनशिला समारंभ अडपल्ली येथे होणार असून १७७ एकरात पसरलेले हो नवीन विद्यापीठ परिसर प्रगती, नावीन्य आणि अमर्याद शक्यतांचे प्रतीक राहणार आहे. २०२५-२६ पर्यंत १७७ एकर जागेवर अडपल्ली येथे नवीन विद्यापीठ परिसराचा विकास करण्याचा मानस आहे.