काैसर खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : माणसाच्या आराेग्यासाठी अतिशय लाभदायक असणाऱ्या ताडी पेय विक्रीच्या हंगामास सिराेंचा तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात सुरुवात झाली आहे. ताडी पेय हंगामाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडाे नागरिकांना राेजगार मिळत आहे. उन्हाळ्यामध्ये ताडीची मागणी वाढत असल्याने नागरिकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असते.
ताडी व गाेरगा हे दाेन वृक्ष अतिशय दुर्मिळ समजले जात असले तरी सिराेंचा तालुक्याच्या झिंगानूर, रेगुंठा, काेटापल्ली, परसेवाडा, पातागुडम, अंकिसा, नगरम आदी भागातील गावांमध्ये या दाेन्ही वृक्षांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. सध्या थंडीला सुरुवात झाली असून यासाेबतच तालुक्याच्या ग्रामीण भागात ताडी पेय उपलब्ध हाेत आहे. जानेवारीपासून तर मे महिन्यापर्यंत साधारणत: पाच महिने ताडी पेयाचा हंगाम राहणार आहे. सिराेंचा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात ताडी व सिंदी हे पेय उपलब्ध हाेते. मात्र सिराेंचा तालुक्यात ताडीच्या झाडांची संख्या प्रचंड असल्याने ताडीचे प्रमाणही माेठे आहे. ताडी झाडावरून काढल्यानंतर संबंधित झाड पूर्णत: वाळून जाते. त्यानंतर ताडीची झाडे ताेडून टाकली जातात. याचा उपयाेग शेती व घरासभाेवताल कुंपण करण्यासाठी केला जाताे.
गाेरगा व ताडीच्या झाडाच्या पानांचा उपयाेग झाेपडी बांधण्यासाठी आजही केला जाताे. स्थानिक आदिवासी बांधव गाेरगा झाडास कल्पवृक्षासारखे महत्त्व देतात.
तेलुगू भाषक नागरिकांकडून पसंती
तेलुगू भाषक सणासुदीमध्ये ताडी प्राशनास अतिशय महत्त्व देतात. पूर्वीच्या काळात घरात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यास गाेरगा वृक्षातील गाभ्यापासून पीठ बनवून त्यापासून पाेटाची भूक भागविली जात हाेती. गाेरगा झाडाच्या आतील गाभा काढून त्याचे पीठ तयार केले जात हाेते. या पिठापासून बनविलेल्या आंबील पदार्थाचाही दैनंदिन आहारामध्ये वापर केला जात असे. विशेष म्हणजे, तेलुगू भाषक नागरिकांकडून ताडीला माेठी पसंती मिळते.