लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा: पळसगाव येथील उपाशा नाल्यातील रेतीचा शासकीय कामासाठी खुलेआम वापर केला जात आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत या नाल्यातून शेकडा ब्रास रेतीची चोरी करण्यात आली आहे.
रेतीची चोरी करणारे वाघाला आणि हत्तीच्या कळपालाही न घाबरता रात्रभर रेतीची तस्करी करतात. रात्री हत्तीची राखण आणि दिवसा शेती नुकसानीचे पंचनामे करताना नाकीनऊ आलेल्या वनपाल, वनरक्षक यांचे जंगल संरक्षणाकडे फारसे लक्ष दिसत नाही. रात्रभर ट्रॅक्टरच्या आवाजाने जंगलातील वन्य प्राणी सैरावैरा होतात. तसेच जंगलात ट्रॅक्टरच्या टायरने चाकोंड्या पडल्या आहेत. महसुलाची चोरी होत आहे तरी वन अधिकारी गप्प कसे? यांचेही हात रेतीत फसले आहेत की काय असा प्रश्न पडत आहे. शासकीय अंदाजपत्रकात दहा ते पंधरा किमीवरून उच्च प्रतीची टीपीसह रेती आणल्याचे दाखवून कंत्राटदार पैसे उचलतात. परंतु प्रत्यक्षात नाल्यातील चोरीची रेती वापरून करोडो रुपयांचे कामे केली जात आहेत. नाल्यातील व कामाच्या ठिकाणी असलेली रेतीची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी पळसगाव परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
उपाशा नाला प्रादेशिक व एफडीसीएमकडे अर्धा अर्धा विभागून आहे. मिळून गस्त करायची म्हटले तर हत्तीवर लक्ष ठेवावे लागते. महादेवगड रोडवर पूल बांधकाम सुरू आहे. त्यासाठी रेतीचा वापर केला जात आहे. धार्मिक कार्याचे काम असल्याने नागरिक विनंती करतात. नकार देऊनही ऐकत नाहीत. अशा अडचणी आहेत.- निरंजन चौधरी, वनरक्षक, एफडीसीएम