गडचिरोली : जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागडलगत वाहणाऱ्या पर्लकोटा नदीच्या पुलावर अखेर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पुराचे पाणी चढले. त्यामुळे भामरागडसह या तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी पुलावर पाहणी करून बॅरिकेड्स लावून पुलाकडे जाणारा मार्ग बंद केला.
विशेष म्हणजे भामरागड परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने रात्रभरात पुराचे पाणी वाढल्यास ते भामरागडमध्ये शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, पण मंगळवारी पुन्हा पाऊस वाढला. याशिवाय मेडीगड्डा, चिचडोह बॅरेजमधील पाण्याच्या विसर्गामुळे आणि नद्यांच्या बॅकवॉटरमधुळे परिस्थिती बिघडत आहे.
गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे सिरोंचा तालुक्यातील १२ गावांमध्ये पाणी शिरण्याची भीती लक्षात घेऊन त्या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. अहेरी, सिरोचा, भामरागड तालुक्यांमध्ये अनेक मार्ग बंद असून गावे जलमय झाली आहेत.