लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणा राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. फेब्रुवारी महिन्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील शेतीची कामे संपत असल्याने रिकामे राहण्यापेक्षा मजूर तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी जातात. यावर्षीही शेकडो मजूर मिरची तोडण्यासाठी गेले आहेत.दरम्यान केंद्र शासनाने २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच जिल्हा व राज्याच्या सीमा बंद केल्या. त्यामुळे मिरची तोडणीसाठी गेलेले शेकडो मजूर तेलंगणा राज्यातच अडकले आहेत. मिरची तोडणीचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आहे. काही मजूर तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परत येण्याच्या तयारीत होते. मात्र लॉकडाऊन केल्यामुळे १४ एप्रिलपर्यंत ते घराकडे परत येण्याच्या आशा मावळल्या आहेत. देशात कोरोनाची साथ सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी आहे, त्यांना फोन करून आरोग्याबाबत विचारणा केली जात आहे. तर काही वयस्क मजुरांकडे फोनसुध्दा उपलब्ध नाही. अशांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.प्रशासन पुढाकार घेणार का?आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील देवानंद तागडे यांच्यासह १९ जण मिरची तोडण्याकरिता तेलंगणा राज्यातील माहदुदाबाद जिल्ह्यातील कुर्वी तालुक्यातील बिरिया तांडा या गावात मिरची तोडण्यासाठी गेले होते. सदर मजूर अजूनपर्यंत परत आलेले नाहीत. ज्या गावात मिरची तोडण्यासाठी नागरिक गेले होते, त्या गावातील नागरिक मिरची तोडणाऱ्या मजुरांना गावातून हुसकावून लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तेलंगणा सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेऊन त्या लोकांना गावात आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आशिष तागडे यांनी केली आहे.
मिरची तोडण्यासाठी गेलेले गडचिरोलीतील शेकडो मजूर अडकले तेलंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:46 AM
मिरची तोडण्याचा रोजगार मिळतो म्हणून फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील शेकडो मजूर तेलंगणा राज्यात गेले आहेत. पण लॉकडाऊनमुळे ते आता तिकडेच अडकून पडल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेत पडले आहेत.
ठळक मुद्देस्थानिकांचा त्रास वाढला लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा