चामोर्शी येथे मॅराथॉन स्पर्धा : व्हीएलई वेल्फेअर सोसायटीचा उपक्रम चामोर्शी : कॅशलेस व्यवहारांच्या जागृतीसाठी व्हीएलई वेल्फेअर सोसायटी चामोर्शीच्या वतीने मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. केडीडी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांच्या हस्ते मॅराथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या स्पर्धेमध्ये चामोर्शी तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. पुरूषांच्या गटातून प्रथम क्रमांक केडीडी महाविद्यालयाचा विद्यार्थी किशोर जुनघरे, द्वितीय क्रमांक हेमंत माडेमवार तर तृतीय क्रमांक मुकेश गुरनुले यांनी पटकाविला. महिला गटातून प्रथम क्रमांक भगवंतराव हायस्कूल, लखमापूर बोरीची विद्यार्थिनी दिपाली वैरागडे, द्वितीय क्रमांक याच महाविद्यालयाची काजल बांगरे तर तृतीय क्रमांक केडीडी महाविद्यालयाची भारती वासेकर हिने पटकाविला. विजेत्यांना प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री, प्रा. संजय म्हस्के, प्रा. झाडे, राकेश खेवले, प्रा. बावणे, आंबोरकर यांच्यासह प्रशस्ती पत्रासह रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डी. जी. म्हशाखेत्री म्हणाले की, कॅशलेस व्यवहार करणे कठीण असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. कॅशलेस व्यवहारांमुळे काळ्या पैशाला प्रतिबंध घालणे शक्य होईल. त्यामुळे शासन कॅशलेस व्यवहार करण्यावर अधिकाधिक भर देत आहे. विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी स्वत:च्या पालकांकडे आग्रह धरावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यशस्वीतेसाठी शंकर दास, रवी बोधलकर, तुषार कर्णे, सपन हाजरा, रूपेश डांगे, प्रविण आंबोरकर, सुभाष गडपायले, विकास दुधबावरे, शंकर पिपरे, प्रविण उंदीरवाडे, दर्शन सोरते, विशाल शिंदे यांनी सहकार्य केले. सदर मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशन ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
कॅशलेस प्रचारासाठी धावले शेकडो युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2017 1:37 AM