लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. रोजगार मिळण्यासाठी काम पुन्हा सुरू करावे, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीद्वारे सुरजागड पहाडावरील लोहखनिज उत्खननाचे काम सुरु होते. या कामावर शेकडो मजूर काम करीत होते. परंतु १६ जानेवारीला गुरुपल्ली गावाजवळ लोहखनिज वाहतूक करणाºया एका ट्रकने बसला चिरडल्याने चार जण ठार झाले. या अपघातानंतर अचानक लोहखनिज उत्खननाचे काम बंद करण्यात आले. यामुळे शेकडो मजुरांच्या हातचे काम हिरावले गेले. त्यानंतर काम सुरु करण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना मजुरांनी एक पत्र दिले होते. काम सुरु न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही मजुरांनी दिला होता. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने अनेक मजुरांनी ५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण आरंभिले होते. दोन दिवसांनतर काम पूर्ववत सुरु करण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.परंतु साडेतीन महिने उलटूनही काम सुरु न झाल्याने उत्खननाच्या कामावरील मजूर, ट्रक व ट्रॅक्टरचालक आणि त्यावरील कामगारांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत असून, ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्यामुळे उत्खननाचे काम तत्काळ सुरु करावे, अशी मागणी स्थानिक मजुरांनी केली आहे.गडचिरोली जिल्हा आधीच उद्योगविरहीत असून, लॉयड मेटल्स कंपनीच्या माध्यमातून कोनसरी येथे उद्योग सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला होता. ज्या शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटपही करण्यात आले होते. परंतु अपघातातनंतर काही राजकीय मंडळींनी उत्खननाचे काम बंद करण्यास भाग पाडल्याने मजुरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्खनन तत्काळ सुरु न झाल्यास सुरजागड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जिल्हावासीयांना मुकावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
कामगार दिनीच कामगारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:10 AM
रोजगारासाठी वनवन भटकणाऱ्या दुर्गम भागातील नागरिकांना लॉयड मेटलच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध झाले होते. मात्र एटापल्लीजवळ झालेल्या अपघातानंतर लोहखनिज उत्खननाचे काम बंद पडले. त्यामुळे या ठिकाणी काम करीत असलेल्या शेकडो मजुरांचा रोजगार बंद झाला आहे.
ठळक मुद्देशेकडो मजुरांवर बेरोजगारीचे संकट : साडेतीन महिन्यांपासून सुरजागड येथील काम बंद